Thursday, August 2, 2018

LADAKH - The Pride Of INDIA

हायस्ट मोटारेबल रोड इन द वल्ड असणारी जागा आणि सेकंड कोल्डेस्ट हॅबिटट इन द वल्ड असणारी जागा ! 
द लामा लॅण्ड...! 
द रूफ ऑफ द वल्ड..!

भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ, ट्रेकर्स चे नंदनवन, निसर्गाचे विविध अंगाचे दर्शन अशी रेलचेल असणाऱ्या तसेच निसर्गानं मुक्त हस्तानं केलेली सजावट, भारतीय जवानांमुळे वाटणारी सुरक्षितता आणि जगण्याचा आनंद देणारी निसर्गयात्रा अशी ही लेह-लडाखची भटकंती एकदा तरी आयुष्यात अनुभव घेऊन बघावीच जणू अशी काही मनाशी पक्की गाठच यांनी मारून माझ्यासोबत सकाळी सकाळी भर पावसात बांद्रा टर्मिनस वरून स्वराज एक्सप्रेसने बाहेर मुंबईमध्ये पडणारा पाऊस आणि भरलेलं पाणी बघत जम्मूचा रस्ता धरला 2 टियर एसी ची थंड हवा खात मुंबईत भरलेल्या पाण्याच्या बातम्या बघत यांनी सलग 2 ते 3 वर्षे वाट पाहत असलेल्या सुखद स्वप्नाचा प्रवास सुरू झाला दुसऱ्या दिवशी जम्मू पोच झालो श्री अमरनाथ यात्रेच्या काही कारणावरुन रस्ता बंद असल्याने आम्ही जम्मू मध्ये रघुनाथ मंदिर पाहून हॉटेल वर थोडी विश्रांती घेऊन रात्री 2।30 च्या सुमारास श्रीनगर चा रस्ता धरला अमरनाथ यात्रेकरूंच्या संरक्षणार्थ बऱ्याच ठिकाणी चेकिंग असल्याने बऱ्याचदा रस्त्यात थांबावे लागत होते पण त्यातच पहाट झाल्यावर जम्मू-काश्मीर हायवेवरचा प्रवास म्हणजे नंदनवन काय असतं याचा अनुभव सगळे घेत होते ; नजर जाईल तिथवर विपुल सृष्टीसौंदर्य...येथील अतिशय थंड हवामानामुळे स्वेटर, ग्लोव्हज, जॅकेट्स अशी तयारी करावी लागते आणि ती सर्व तयारी सर्वानी मी सांगितल्याप्रमाणे आधीच केली होती. थोड्याच वेळात दऱ्याखोऱ्यांतला थंड वारा सुखावू लागला. मंत्रमुग्ध करणारी दृश्यं दिसू लागली. सुरूच्या झाडांच्या सोबतीनं हा प्रवास छान वाटत होता
लेह-लडाख हे देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपकी एक असले तरी या ठिकाणी पोहचण्याचा प्रवास वैविध्यपूर्ण असला तरी तितकाच आव्हानात्मक असतो याची पुरेपूर कल्पना आधीच सर्वांना दिली होती. पण जेव्हा प्रत्यक्षात ते अनुभव घेत होते तेव्हा त्यातील रोमांच त्यांच्याही चेहऱ्यावर कळून येत होता.
जम्मु वरून श्रीनगर जाताना आपली भारतीय सेना किती खडतर परिस्थितीत कार्यरत असते ते रस्त्यावर ठिकठिकाणी तैनात असणारे जवान पाहून अभिमान वाटत होता. त्यांच्याकडे पाहून ठोकलेल्या सलामाला जेव्हा तसंच प्रत्युत्तर मिळतं, तेव्हा ते पाहून अभिमान वाटतो आणि उर भरून येतो.
जम्मू बायपास घेतला की सुरू झाली हिमायलन चढाई! आता हा हिमायल पुढचे अनेक दिवस सोबत राहणार होता. हिमायलाची अनेक रुपं ह्या प्रवासात बघायला मिळणार होती. देवदार आणि पाईन ट्री मधील हिरवा हिमालय, अमरनाथाला तयार करणारा पांढरा हिमायल आणि लडाख मधील ग्रे हिमालय, ज्यावर गवत सुद्धा दिसत नाही तो हिमालय !
दुपारी श्रीनगर पोच होताच तिथल्या निशांत गार्डन ला भेट देऊन सायंकाळी सूर्यास्तावेळी दल लेक पेक्षा सुंदर सुप्रसिद्ध निगीन लेक मध्ये शिकारा मध्ये फेरफटका मारून एक विलक्षण अनुभव घेत अशा त्या निर्सगसंपन्न प्रदेशातून सुरू असलेला प्रवास रात्री दललेक मधल्या हाऊसबोट मध्ये मुक्कामासाठी थांबला
रात्रभर पाण्यात राहिल्यावर दुसऱ्या दिवशी बालताल मार्गे कारगील कडे निघालो कारगिलच्या आसपासचा प्रदेश लष्करीदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचा आहे.
आता मला वेध लागले होते झोझिला पासचे. सोनमर्ग पार केल्यावर लगेच झोझिला लागतो , झोझिला चढण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक अप्पर आणि दुसरा लोअर! अप्पर मार्ग तुलनेने खूप सोपा आहे. झोझीला पास म्हणजे अरुंद रस्ता, उंच डोंगर आणि केव्हाही दरड कोसळेल अशी परिस्थिती. इथं बर्फाचं पाणी आणि चिखलामुळं गाड्यांचा वेग कमी होतो. त्या चिखलातून मिळेल तशी वाट काढून आम्ही जोजिला पार केलं. तो पार करत असताना आमची गाडी आणि एक मोठा ट्रक एकमेकांच्या जवळ घासण्याइतपत पुढे आल्यानंतर सगळ्यांचाच विषय खोल झाला होता पुढच्या प्रवासात गाड्या दिसणं दुर्मीळ झालं. नागमोडी वळणं, चारही बाजूनं उंचच उंच पर्वतरांगा, पांढरा शुभ्र स्वच्छ बर्फ पाहून मन आनंदलं. जिथं तिथं थांबून फोटो काढत होतो. इतकी नयनरम्य दृश्यं म्हणजे आयुष्य सार्थक झाल्यासारखं.
सोनामर्ग मधून पुढे गेल्यावर सिंध नाला वाहतो. इथे नाला म्हणजे महाराष्ट्रातील नाला हा शब्दशः अर्थ नव्हे तर ग्लेशिअर मधून येणारे पाणी, एकदम स्वच्छ असते. त्याच्याच आजूबाजूला हॉटेल आहेत जिथे मस्त बसून कहावा किंवा चहा पिता येतो! अमेझिंग जागा ! आम्ही मग तिथे बाकीचे adventure ऍक्टिव्हिटी करत असताना कहावा चवी साठी घेतला. ज्या टपरीतून आम्ही कहावा घेतला, त्याने इतका सुंदर कहावा दिला की विषयचं एण्ड! अखेर कारगील मुक्कामी पोहोचलो. वॉर मेमोरिअल पाहत असताना आपल्या जाबाज जवानांप्रती असणारा आदर द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही
लेहला जाण्यापूर्वी कारगिलला मुक्काम करावाच लागतो द्रासचे युद्धस्मारक पाहताना धन्य वाटते. द्रास हे आशिया खंडातील सर्वात थंड ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. द्रासचे खोरे हे लडाखचे प्रवेशव्दार म्हणजेच Gateway of Ladakh म्हणून ओळखले जाते.
द्रासहून केव्हा एकदा आपण लेहला जाऊ याची उत्सुकता लागून राहिलेली असते. लेह हा पृथ्वीवरचा जणू स्वर्गच आहे. येथील अविस्मरणीय निसर्गसौंदर्याने भान हरपून गेल्याशिवाय राहत नाही. हिमालयाची बर्फाच्छादित पर्वतशिखरे, मध्येच सखल भूमीत दिसणारे नद्यांचे खळाळणारे प्रवाह, त्या भोवतालची हिरवाई, पारदर्शी निळे पाणी, तलाव, सरोवर, खोल दऱ्या असा नजारा पाहताना माझ्यासोबत आलेले एका वेगळ्याच विश्वात सगळे वावरत होते. घाईगर्दीच्या मुंबई पुणे सारख्या शहरी जीवनात काम करून आलेला ताण यांच्या डोक्यावरून लेह-लडाखचा निसर्ग पाहून जणु निघूनच गेला होता अस दिसत होतं. या भूमीवर एका विलक्षण शांतीचा अनुभव घेत या सर्व जणी प्रवासाचा आनंद घेत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर लेह रस्त्यावर असणाऱ्या कारगीलहून लामायारू मॉनेस्ट्री च्या दिशेनं निघालो. वाकड्यातिकड्या वळणांवरून गाड्या चालताना दिसतं ते अतिशय मनमोहक वाटत. लामायुरू हे अतिशय सुंदर छोटस शहर असलं तरी इथं डोंगरावरची पांढऱ्याशुभ्र मातीची घरं, लामा लोकांचं मंदिर आपल्याला आकर्षूण घेतातच. इथं दर्शन घेतल्यावर आम्ही लेह-लडाखकडे निघालो. तिथून निघाल्यावर मूनलँड पर्वतरांगा दिसतात. याच रस्त्यावर मॅग्नेटिक हिल नावाची टेकडी आहे. इथं एके ठिकाणी चारचाकी मिनीबस गाड्या ओपोआप चढ चढतात रिव्हर्स मध्ये असेल तर चढांला सुद्धा रिव्हर्स ओपोआप जाते. येथे चुंबकीय परिणाम अनुभवायला मिळतात. निसर्गाचा हा एक चमत्कारच आहे.
निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आव्हानं पेलत 600 किमीचं अंतर कापून आम्ही लेह शहरात पोहोचलो.
आणि हॉटेल वर पोहोचताच तेथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले होते ती पूर्ण संध्याकाळ सांस्कृतिक कार्यक्रमात गेली टोटली वर्थ. आणि मस्त पैकी जेवनावर ताव मारून आम्ही उद्याच्या लोकल साइट सिईंगसाठी तयार झालो.
लेहमध्ये शांती स्तूप आहे. प्राचीन, शाही सौंदर्याचा हा एक आविष्कार आहे. या स्तुपामध्ये बुद्धाचे पुतळे आणि जुनी, दुर्मीळ हस्तलिखिते आहेत. लेहमधील आणखी पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे शेय मॉनस्ट्री येथे बुद्धाचा धातूचा पुतळा आहे. लडाखमधील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुतळा आहे. लेहपासून १५ कि.मी. अंतरावर हे ठिकाण असून लडाखचा राजा डेलडान नामग्याल याने १६५५ मध्ये या मठाची स्थापना केली. उन्हाळ्यामध्ये लडाखचा शाही परिवार येथे वास्तव्य करीत असे. हा मठ पाहण्यासारखा आहे. बौद्ध धर्माच्या या प्रदेशाला आध्यात्मिक पाश्र्वभूमीही आहे. सर्व जणी प्राचीन बौद्ध मठ पाहताना एका गूढ विश्वात रमून गेलेल्या दिसत असत,
मंध्यतरी मी आम्हाला उद्यापासून लागणारे इनर लाईन परमिट काढून घेतले
दुसऱ्या दिवशी नुब्रा व्हॅली ला जात असताना स्वप्नवत वाटणाऱ्या अशा खारदुंगला-पासचा प्रवास सुरू झाला. जगातला मोटारगाड्या जाणारा सर्वांत उंच मार्ग. समुद्रसपाटीपासूनची उंची १८ हजार ३८० फूट. हे लेहपासून ४० किलोमीटरवर आहे. हा प्रवासही अतिशय खडतर आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सांभाळून प्रवास करावा लागतो. दरडी, खराब, अचानक समोरून येणाऱ्या गाड्या, ब्लाइंड स्पॉट्स रस्ते वगैरे अडथळे पार करत खारदुंगलाला पोहोचलो. तेव्हा आकाश स्वच्छ होतं, डोळ्यांचं पारणं फिटलं पण ऑक्सिजन ची कमतरता भासायला लागल्या मुळे आम्ही पुढचा प्रवास करने उचीत समजलो आणि पुढे प्रयाण केले लेह येथून बर्फाचे वाळवंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या नुब्रा व्हॅलीकडे आमचा प्रवास सुरू होता. नुब्रा खोऱ्यातून नुब्रा नदी वाहते. तेथील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ पाहण्यासारखे ठिकाण आहे. विविधरंगी फुलांची उधळण पाहायला मिळते परंतु यावेळेस फुले काही पाहायला मिळाली नाहीत. वाळवंटात उंटावरून सफारी करून सफरचंद अपरिकॉट च्या बागेत वसवलेल्या हॉटेल वर मुक्कामी आलो हॉटेलच्या मागच्या बाजूलाच मोठा ओढा आणि त्यातून खळखळून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज, दाट अंधार, लुकलूकणारे तारे आणि त्यातच गेलेली लाईट आज जरा जास्तच भयानक वाटत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठुन प्रवास करण्याचं मी सांगितले होते म्हणून अथवा घाबरून म्हणा सगळ्यांनी लवकर झोपणेच पसंद केले दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताच लेहमधील पँगाँग सरोवर या ठिकाणी जायचं ठरलं होते सर्वांचे आवडते ठिकाण. लडाखहून हे सरोवर 150 कि.मी. अंतरावर आहे. डोंगरांचा बदलता रंग, पांढऱ्या स्वच्छ वाळूचे कण, निळ्या गडद रंगातलं शांत पाणी इथं आल्यावर मनही शांत होतं. अत्यंत पारदर्शी, नितळ पाणी आणि लुभावणारे निसर्गसौंदर्य येथे पाहायला मिळते. संपूर्ण वर्षभर येथे छान हवामान असते. पँगाँग त्सो हा १४२७२ फुट वा ४३५० मिटर्स वर आहे. एकुण लांबी १३४+ किमी आणि त्याचा अर्धा भाग हा चीन मध्ये आहे तर अर्धा आपल्याकडे. इतर तलावांसारखाच हा देखील खार्‍या पाण्याचा तलाव आहे. लेह पासून १५६ किमीवर असल्यमुळे इथे जायला साधारण ५ तास लागू शकतात. जर आपण लवकर निघालो तर एकाच दिवशी जाणे येणे करता येते. काळ्या मानेचे सबेरियन क्रेन येथे दिसतात. या दुर्मीळ पक्ष्यांची प्रजोत्पादनाची ही जागा आहे असे सांगितले जाते.
लडाखमध्ये बौद्ध मठ आणि बुद्धाचे सुंदर पुतळे पाहायला मिळतात. लडाखच्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासाची प्रचीती येते. लडाखमध्ये ज्याप्रमाणे दऱ्याखोऱ्याचा प्रदेश आहे त्याचप्रमाणे सपाट प्रदेश आणि वाळवंटही लागतो. तेथे उंटावरची सफारी करता येते. त्याचप्रमाणे जीपमधूनही निसर्ग न्याहाळता येतो. लेहच्या रस्त्यांवर मोटरबायकिंगची मजा अनुभवुन आम्ही हॉटेल चा रस्ता धरला.
लेह-लडाखचा प्रवास करताना बऱ्याचदा भेटणारे मराठी प्रवासी माझ्यासोबत आलेल्या सर्व मुलींना अतिशय आश्चर्याने विचारायचे तुम्ही फक्त मुलीच इतक्या लांब, ते सुद्धा एकटेच आणि लडाख मध्ये यावरून सगळ्यांच्याच पंखांमध्ये थोडं जास्तीच बळ आणि आत्मविश्वास वाढला होता. लडाख मध्ये तिबेटी आणि लडाखी खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला. येथे काही सण, उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी हेमिस आणि लोसार हे उत्सव प्रसिद्ध आहेत. धातूच्या शिल्पाकृती, पेटिंग्ज आणि पश्मीना शालींसाठी लडाख प्रसिद्ध आहे यातील काही खरेदी सुद्धा केली. दुसऱ्या दिवशी सकाळी बकुळा रिम्पोचे विमानतळावरून आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. लडाख पर्यटनाच्या आयुष्यभर पुरतील अशा सुखद मनमुराद आठवणींची बॅग भरून आम्ही लडाख चा निरोप घेतला
जाता जाता मला Border Road Organization (BRO) ला धन्यवाद द्यायचे आहेत कारण ती लो़ंक इतक्या उंचावर दुर्गम हिमालयात रस्ते बांधतात. हाय माऊंटेन पासेस मध्ये दर दहा मिनिटाला वेगळे वातारवरण असते. ऑक्सिजन विरळ तर असतोच. पण हे लोकं स्त्री आणि पुरूष ज्या रितिने काम करतात आणि इतके चांगले रोडस बांधतात ते पाहून महाराष्ट्रातील PWDला त्यांच्याकडे क्लास साठी पाठवावे असे मला वाटते. सिरियसली हॅटस ऑफ टू B.R.O - Border Road Organization

#AHN
09664286300 / 08390922322